Friday, April 5, 2024

शिक्षणामुळेच क्रांती घडते- डॉ. मल्लिकार्जुन करजगी

 राणीसावरगाव  ( प्रतिनिधी):-  गुणवत्ता मिळविण्यासाठी मेहनत करावी लागते, मेहनत आणि शिक्षणामुळेच नवक्रांती घडू शकते, त्यासाठी शिबिर आणि  समाजप्रबोधन कार्यक्रमाची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. मल्लिकार्जुन करजगी यांनी आज येथे केले. 


    स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने परभणी- हिंगोली जिल्हास्तरीय युवक -युवती नेतृत्व विकास प्रशिक्षण शिबिराच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कांतराव पोले यांची उपस्थिती होती तर यावेळी कार्यक्रम अधिकारी डॉ. विश्वनाथ रासवे, डॉ.बालाजी शिंदे यांची उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते महात्मा गांधी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर संस्थेचे संस्थापक प्राचार्य डॉ शिवाजीराव  दळणर यांच्या प्रतिमेचे पूजन केले. त्यानंतर उत्कृष्ट निवास आणि भोजन व्यवस्था केल्याबद्दल रामेश्वर सोनसळे, उत्कृष्ट छायाकण केल्याबद्दल प्रा डॉ. कपिल लामतुरे, उत्कृष्ट सेवा पुरविल्याबद्दल गिरीधर यमगर, उत्कृष्ट तंत्रसहाय्य केल्याबद्दल गोवर्धन जोगदंड आणि उत्कृष्ट सूत्रसंचलन केल्याबद्दल डॉ. तुकाराम बोबडे यांचा सत्कार करण्यात आला.  त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते सहभागी युवक- युवती यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले आहे. यावेळी करजगी म्हणाले,” ग्रामीण भागातूनच विद्यार्थी घडतात. शहरातील महाविद्यालयामध्ये सोयी सुविधा उपलब्ध असतात मात्र तेथील विद्यार्थी कमी प्रमाणात घडतात. गुणवंत विद्यार्थी शिबिरामधून घडत असतात कारण शिबिरामध्ये तज्ञ व्यक्तींचे भाषणे, माहिती, मुलाखती ऐकायला मिळत असतात.नवक्रांती घडविण्यासाठी शिक्षण आवश्यक आहे. शिक्षणाशिवाय क्रांती घडू शकत नाही.  शिक्षणातून व्यक्ती मोठा होऊ शकतो. शेवटच्या क्षणापर्यंत शिक्षण शिकत राहिले पाहिजे. या पाचदिवसीय शिबिरामधून एक जरी विद्यार्थी घडला तर या शिबिराचे फलित झाले आहे, या शिबिरामधून तसे दिसत आहे, म्हणजेच ग्रामीण भागातील या शिबिराचे आयोजन केल्याबद्दल  महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभगाचे कौतुक केले आहे. त्याचबरोबर भारतीय समाज सुधारला पाहिजे समाजामध्ये सामाजिक योगदान महत्त्वाचे आहे. शिक्षण घेत -घेत समाजसेवा केली पाहिजे. मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये सहभाग घेतला पाहिजे, यातूनच आदर्श विद्यार्थी व चांगला माणूस घडू शकतो.  झोपेत जे पडतात ते स्वप्न असतात. झोपेत स्वप्न पडतात आणि झोपू देत नाहीत ते स्वप्न असतात, असेही त्यांनी सांगितले. 


या कार्यक्रमाचे मारोप करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कांतराव पोले म्हणाले
, युवकासमोर दृष्टी असली पाहिजे. नेतृत्व गुण मिळविण्यासाठी विकासाच्या वाटचालीकडे लक्ष दिले पाहिजे. दिशा आणि दृष्टी प्राप्त झाली तरच विद्यार्थी घडू शकतो. लोकशाहीमध्ये डोके मोजले जातात आणि या शिबिरामध्ये विद्यार्थ्यांचे ज्ञान दिले जाते. विद्यार्थ्यांनी ज्ञान मिळण्यासाठी शिबिराचा लाभ घेतला पाहिजे असेही त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेचे डॉ. बालाजी शिंदे यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन इंग्रजी विभागाचे प्रमुख डॉ. तुकाराम बोबडे यांनी केले तर आभार राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. विश्वनाथ रासवे यांनी मानले. या कार्यक्रमाला युवक -युवती आणि शिक्षक वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.




No comments:

Post a Comment

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयात ९८ जणांची सुरक्षा रक्षक पदासाठी निवड

राणीसावरगाव (प्रतिनिधी) : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग, विद्यार्थी विकास समिती आणि एस. एस. सिक्यु...