परभणी (प्रतिनिधी):- मानवाला यशस्वी होण्यासाठी व जीवनाची दिशा बदलण्यासाठी वाचन संस्कृती जोपासली पाहिजे, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. कांतराव पोले यांनी आज येथे केले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना व यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अभ्यास केंद्र व पंच भाषा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने वाचन संकल्प महाराष्ट्राचा पंधरवाड्याचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी डॉ. कांतराव पोले यांची उपस्थिती होती तर प्रमुख वक्ते म्हणून हिंदी विभागाचे विभाग प्रमुख डॉ.नर्सिंगदास बंग, समन्वय डॉ.श्रीहरी चव्हाण यांची उपस्थिती होती. मान्यवरांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संस्थापक अध्यक्ष कर्मयोगी कै.डॉ.शिवाजीराव दळणर यांच्या प्रतिमेचे पूजन केले त्यानंतर विद्यार्थ्यांचा सत्कार शिक्षक वृंदांनी केला. यावेळी संस्थेच्या प्राचार्य डॉ कांतराव पोले म्हणाले,साहित्य भरपूर आहे,काय वाचलं पाहिजे आणि काय वाचलं नाही पाहिजे हे ज्या विद्यार्थ्याला कळाले तोच विद्यार्थी आयुष्यात यशस्वी झाला आहे. सत्वपरीक्षेतून समोर जाण्यासाठी वाचन असणे आवश्यक आहे. वाचन संस्कृती जोपासली तर आयुष्यात विद्यार्थी बेरोजगार राहणार नाही कारण वाचन संस्कृती ही तिमीरातुनी तेजा कडे नेणारी वाट आहे. मासिकांमधून आणि वृत्तपत्रातून समाजातील घटना देशातील नावीन्यपूर्ण माहिती इत्यादी ज्ञान मिळते, याचाही फायदा विद्यार्थ्यांना होत असतो, असेही त्यांनी सांगितले. यावेळी डॉ.बंग म्हणाले, वाचनामुळे मानव हा मुक्त वातावरणात वावरत असतो. त्याचबरोबर शब्दसंग्रह साठवून स्पष्ट बोलणारा वक्ता म्हणून समोर येतो. वाचनाचे फायदेच आहेत नुकसान नाही आपली स्मरणशक्ती एकाग्रता वाढत असून आपल्या लिखाणामध्ये एक प्रकारची धार, लय येत असते, असेही त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक संस्कृत विभागाचे विभाग प्रमुख डॉ. अभय पाटील यांनी केले तर सूत्रसंचलन डॉ.शंकर घाडगे यांनी केले या कार्यक्रमाचे आभार डॉ. श्रीहरी दासू चव्हाण यांनी मानले. या कार्यक्रमाला शिक्षक वृंद, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
.


No comments:
Post a Comment