Monday, August 4, 2025

अण्णाभाऊंच्या साहित्यातून संर्घष करण्याची प्रेरणा मिळते : डॉ. संतोष हंकारे


परभणी (प्रतिनिधी):  लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्यातून वास्तव चित्रण करून समाजातील भेदभाव मिटावा म्हणून सर्व सामान्य माणसांना साहित्याचे नायक बनवले आणि आपल्या साहित्यातून मानवी मूल्यांची पेरणी केली.त्यामुळे त्यांच्या साहित्यातून लोकांना समता आणि न्यायासाठी संघर्ष करण्याची प्रेरणा मिळते. असे प्रतिपादन मराठी विभागाचे विभाग प्रमुख डॉ. संतोष हंकारे यांनी केले आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना व मराठी विभागाच्या वतीने लोकमान्य बाळ गंगाधर टिळक पुण्यतिथी आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त व्याख्यानात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. रेणुकादास बोनर यांची उपस्थिती होती; तर प्रमुख पाहुणे म्हणून मराठी विभागाचे डॉ. संतोष हंकारे, इतिहास विभागाचे डॉ. गणेश माने, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, डॉ. अंगद गडमे यांची उपस्थिती होती. सर्व मान्यवरांच्या हस्ते कर्मयोगिनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, लोकमान्य टिळक, लोकशाहीर अण्णाभाऊ  साठेयांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांचा  सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. हंकारे म्हणाले,“ अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्यातून दलित, पीडित,श्रमिक कष्टकरी कामगार आणि वंचिताच्या जीवनातील दुःख, दारिद्र्य आणि त्यांचे संर्घषमय वेदनादायी जीवन जनतेसमोर मांडले. त्यांच्या साहित्यातून लोकांचे दुःख, दारिद्र्य जेसे येते तसे प्राप्त परिस्थितीशी दोन हात करत जगण्यासाठी चालेला संर्घष याचे प्रभावी चित्रण येते. त्यांनी लावणी, पोवाडा आणि छक्कड , लोकनाट्य, शायरी यासारख्या लोककला प्रकारांचा उपयोग करून संयुक्त महाराष्ट्र चळवळीतही महत्त्वपूर्ण योगदान देऊन लोकांमध्ये जनजागृती केली. अण्णाभाऊ साठे हे जनतेचे वेदना जाणणारे व जनतेच्या मनभावना ओळखणारे, जनतेची कदर करणारे लोकशाहीर होते. माणसाचं आत्मबल जागं करणारे लेखन त्यांनी केले. त्यांनी ३५ कादंबऱ्या, १९ कथासंग्रह, पोवाडा, एक प्रवासवर्णन, १८लोकनाट्ये आदिसाहित्य प्रकारात विपुल लेखन केले. या सर्व साहित्यातून त्यांनी एकता आणि समतेची शिकवण दिल्याचे प्रकर्षाने आपल्याला जाणवते. ते मानव मुक्ती लढ्याचे नायक होते. त्यांनी केवळ भूक आणि अश्रूची कथा लिहिली नाही तर त्यांनी बहुजनांच्या इतिहासाची गौरव गाथा ही लिहिली आहे. एक भूमिका घेऊन साहित्य निर्मिती केल्यामुळे त्यांचे साहित्य वैश्विक पातळीवर जाऊन पोहोचले. त्यांच्या साहित्याचे २७ भाषेत भाषांतरीत झाले असल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ रेणुकादास बोनर म्हणाले,“ लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांनी  देशाच्या हिताचे काम केले आहे, भारताला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी दोघांचाही सिंहाचा वाटा आहे ,असेही त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी दिव्या टोकलवाड यांनी केले तर आभार रोशन घाटके यांनी मानले. या कार्यक्रमाला  स्वयंसेवक,विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी 

जलतरण स्पर्धेतील विद्यार्थ्यांचा पवन गणपत जिलेवाड याचा सत्कार करण्यात आला.स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड अंतर्गत लातूर येथे दि.28 जुलै 2025 रोजी अंतर महाविद्यालये जलतरण स्पर्धा राजश्री शाहू महाविद्यालय येथे आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत 50 मीटर फ्रीस्टाइल  जलतरण स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळविला. व त्याची अंतर विद्यापीठीय या जलतरण स्पर्धेसाठी निवड विद्यापीठाच्या संघात झाली. त्याबद्दल संस्थेचे सचिव कृष्णाभैया दळणर, प्राचार्य डॉ. रेणुकादास बोनरक्रीडा संचालक डॉ. विठ्ठल डुमनर आदींनी कौतुक केले आहे.



 

No comments:

Post a Comment

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयात ९८ जणांची सुरक्षा रक्षक पदासाठी निवड

राणीसावरगाव (प्रतिनिधी) : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग, विद्यार्थी विकास समिती आणि एस. एस. सिक्यु...