शिक्षण, जिज्ञासा आणि आत्मसमर्पण यातूनच राष्ट्र उभारणी - कदम यांचे प्रतिपादन
परभणी (प्रतिनिधी): शिक्षण हे केवळ पदवी मिळविण्याचे साधन नसून व्यक्तिमत्त्व विकास आणि राष्ट्रनिर्मितीचे प्रभावी माध्यम आहे. विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबत ज्ञानाची जिज्ञासा, कष्ट करण्याची तयारी आणि आपल्या ध्येयाप्रती आत्मसमर्पणाची भावना जोपासली, तर त्यातून सक्षम व्यक्तिमत्त्वांची निर्मिती होऊन राष्ट्र उभारणीला बळ मिळते, असे प्रतिपादन आदर्श शिक्षक देसाई कदम यांनी केले.पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालय राणीसावरगांव येथे पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभ प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव कृष्णाभैया शिवाजीराव दळणर यांची उपस्थिती होती तर प्रमुख अतिथी म्हणून आदर्श शिक्षक श्री देसाई कदम, प्रमुख उपस्थिती प्राचार्य डॉ. रेणूकादास बोनर, परीक्षा विभाग प्रमुख प्रा. डॉ. नसिंगदास बंग, प्रा डॉ. तुकाराम बोबडे, डॉ बालाजी शिंदे, डॉ आनंद घन, डॉ विठ्ठल डुमनर, डॉ दिपाली पांडे यांची उपस्थिती होती. विद्यापीठाच्या प्रोटोकॉल नुसार परीक्षा प्रमुखांनी विद्यापीठ ध्वज घेऊन सर्व मान्यवर व पदवी प्राप्त विद्यार्थी तसेच प्राध्यापक मिरवणूकी द्वारे सभागृहात दाखल झाले.
मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन, प्रतिमा पूजन व विद्यापीठ गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी आदर्श शिक्षक कदम म्हणाले, कोणत्याही परीक्षेत यश मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांनी सुरुवातीपासून आपले ध्येय निश्चित करून अभ्यास केला पाहिजे. स्पर्धा परीक्षा ही केवल पाठांतरांची परीक्षा नसून विषय समजून घेण्याची आणि योग्य पद्धतीने मांडणी करण्याची ही परीक्षा आहे. त्यामुळे आजच्या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांनी मूलभूत संकल्पना समजून त्या आधारित अभ्यास करावा. अनेक पुस्तके वाचण्यापेक्षा निवडक पुस्तकांचा अभ्यास करणे फायद्याचे आहे. विद्यार्थ्यांनी मोबाईल आणि सोशल मीडियाचा मर्यादित वापर करून त्याचा शैक्षणिक साधन म्हणून उपयोग करावा, असे त्यांनी सांगितले.
यावेळी कृष्णा दळणर म्हणाले, विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमा सोबत विविध उपक्रमामध्ये सहभागी होऊन व्यक्तिमत्व विकास साधावा. आपल्या महाविद्यालयात बी.ए., बी.कॉम, बी.एससी, सोबत इतर कोर्सेस आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थी पदवी संपादन करतात ही आनंदाची बाब आहे. विद्यार्थ्यांनी न्यूनगंड न बाळगता कठोर परिश्रम करून आयुष्यात यशस्वी झाले पाहिजे. त्या बरोबरच आई-वडील व आपल्या महाविद्यालयाचे नाव लौकिक करावे, असेही त्यांनी सांगितले. यावेळी प्राचार्य डॉ बोनर यांनीही यशस्वी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. मान्यवरांच्या हस्ते पदवी प्राप्त विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्राचे वितरण करुन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक करताना डॉ नरसिंगदास बंग यांनी कार्यक्रमाचे महत्त्व व परीक्षा विभागाची भूमिका प्रतिपादित करुन विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन संस्कृत विभागाचे डॉ शंकर घाडगे यांनी केले तर आभार डॉ. दिपाली पांडे यांनी मानले. राष्ट्रगीत व मिरवणूक विसर्जनाने कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक, वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.



No comments:
Post a Comment