राणीसावरगाव (प्रतिनिधी): एआय (Artificial Intelligence) मुळे पत्रकारितेला गतीशील आणि आधुनिक रूप प्राप्त होत असून त्याचा दीर्घकालीन संरचनात्मक प्रभाव वार्तांकन, विविधता, लोकशाही आणि जनहितावर पडणार आहे, असे प्रतिपादन शिवाजी महाविद्यालयाच्या वृत्तपत्रविद्या विभागाचे प्रमुख डॉ. सुधीर इंगळे यांनी केले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयाच्या वृत्तपत्रविद्या विभागाच्या वतीने आयोजित “एआयचे पत्रकारितेतील योगदान” या विषयावरील व्याख्यान व निरोप समारंभ कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विभागप्रमुख तथा कार्यक्रमाधिकारी डॉ. बालाजी शिंदे होते. यावेळी डॉ. कपिल लामतुरे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमात मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. आपल्या भाषणात डॉ. इंगळे यांनी सांगितले की, एआयचा उपयोग मानवी जीवन अधिक सुलभ आणि प्रगत करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर होत आहे. शैक्षणिक, वैद्यकीय, अभियांत्रिकी ते अंतराळ विज्ञान अशा विविध क्षेत्रांमध्ये एआयचा वापर वाढत असून माध्यम क्षेत्रातही त्याचा प्रभाव दिसून येत आहे. ते पुढे म्हणाले की, एआयमुळे माहिती शोधण्याची प्रक्रिया अधिक वेगवान व परिणामकारक झाली आहे. तथापि, एआयचा गैरवापरही गंभीर परिणाम घडवू शकतो. उदाहरणार्थ, इजराइलच्या पंतप्रधानांचा एआयद्वारे बनवलेला खोटा व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये त्यांच्या मृत्यूची अफवा पसरवण्यात आली. त्यामुळे एआयचा वापर जबाबदारीने आणि नैतिकतेने केला पाहिजे, असे त्यांनी अधोरेखित केले. यावेळी डॉ. बालाजी शिंदे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, माध्यम क्षेत्रात विविध विभागांमध्ये मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीच्या क्षेत्रात प्राविण्य मिळवून उद्योग किंवा माध्यम क्षेत्रात करिअर घडवावे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ. कपिल लामतुरे यांनी केले. कार्यक्रमाला विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



No comments:
Post a Comment