गंगाखेड तालुक्यातील राणीसावरगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रीय आरोग्य समिती ही आज दुपारी ३.३० ते ४ वाजेदरम्यान राणीसावरगावात दाखल झाली. तेव्हा येथील सर्व कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहून समितीला २०१४ ते आजतागायत कार्याबाबत तब्बल दीड तास आढावा दिला.
विशेषत: दवाखान्याचा परिसर रंगरंगोटी, गप्पीमासे केंद्र, आरोग्याविषयीचे विशेष चित्र फलक व प्रसूती केंद्राचा टापटीपपणा,भिंतीवरील घोषवाक्य आदी बाबींनी केंद्रातील सुशोभीकरण दिसुन येत होते. या समितीत आलेल्या आधिकारी डाॅ. ज्योती, डाॅ. अग्रवाल, ट्रेनिंग सेंटरचे प्राध्यापक डाॅ. चौधरी, जिल्हा जि.प.प्रशिक्षण केंद्राचे डाॅ. भायेकर आदींचा सत्कार होऊन प्रा.आ. केंद्राच्या आढाव्याला सामोरे जाताना कर्मचाऱ्यांची भंबेरी उडाली होती. या समितीला काय सांगायचे काय नाही, याची रंगीत तालीम तालुका आरोग्य अधिकारी अशोक बिराजदार व इतर अधिकार्यांनी काही कर्मचाऱ्यांना विशेष मार्गदर्शन समिती येण्यापूर्वीच केले होते. या निमित्ताने राणीसावरगाव ग्रामस्थ व पत्रकारांना समितीची काय ताकद असते,हे प्रत्यक्ष पहायला मिळाले.